"ओ शुक शुक, मी तुम्हाला एक suggestion देऊ का ?" हे वाक्य जेंव्हा गोरे साहेबानी कारमधून तोंड बाहेर काढून त्या टोल नाक्यावरील केबिन मध्ये बसलेल्या माणसाला फेकून मारले तेंव्हा त्या माणसाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
आमच्या साहेबांच्या चेहऱ्यावरचे अविर्भाव पाहून त्या केबीन मध्ये बसलेला आडाणी माणूस अजिबात इच्छा नसतानाही, " बोला साहेब काय झालं ?" असे म्हणाला.
अहो, टोल चे ६२ रुपये झाले होते आणि आमच्याकडून तुम्ही ७० रुपये घेतले व ८ रुपये चिल्लर नाहीयेत म्हणून त्याचे चोक्लेट्स दिले बरोबर ?
हो " बरोबर " , "आम्ही रोज-रोज चिल्लर कुठून आणायची त्यामुळे आम्ही सर्वांनाच उरलेल्या पैस्याचे चॉकलेट्स देतो ", त्यात काही नवीन नाहीये !.
त्यावर साहेब म्हणाले, " तुमच्याकडे चिल्लर ची कमतरता आहे, हे मला मान्य आहे. परंतु उरलेल्या पैस्यांच्या बदल्यात तुम्ही चॉकलेट्स देता हे मला अजिबात मान्य नाहीये ".
साहेबांचे बोलणे ऐकून तो केबीन मधला माणूस जरा गोंधळात पडला आणि वैतागून म्हणला, "ओ साहेब , तुम्ही आमच्या मॅनेजर ला भेटून तुम्हाला काय मान्य आहे आणि काय मान्य नाही ह्याबद्दल सविस्तर तक्रार करा ".
साहेब म्हणाले, "अरे बाबा मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घे ".
बर सांगा, काय आहे तुमचे " सजेशन " ? , आणि निघा लवकर इथून आम्हाला आमचे काम करू द्या. " न जाणे कहा कहा से आते हैं ! ".
आता साहेब पण जरा चिडून म्हणाले , "अहो चॉकलेट देण्यापेक्षा तुम्ही ड्राइवर ला " ड्राय फ्रुट्स " देत जा, पौष्टीक असतात ". तो समोरचा माणूस विचित्र तोंड करून म्हणाला काय ??
हो खरं तेच बोलतोय , " तसेही तुम्ही दिलेले फालतू चॉकलेट्स, मला नाही वाटत कुणी खात असेल".
मी आपला गप्प बसून होतो . कारण , मला साहेबांची सजेशन फेकून मारण्याची सवय मागील ५ वर्षांपासून माहिती होती.
ह्यांचे हे सजेशन फेकून मारण्याचे काम सुरु असताना आमच्या कारच्या मागे गाड्यांची भली मोठी रांग झाली होती पण ह्या माणसाला त्याच काहीही पडलं नव्हतं.
आता मात्र केबिन मध्ये बसलेला माणूस इतका भडकला होता कि, त्याच्या हातात जर एखादी तलवार असती तर त्याने ह्या गोरे साहेबांची जीभच कापून टाकली असती. परंतु ह्या आमच्या साहेबांना समोरच्या माणसाच्या रिऍक्शन्स शी काहीही देणे-घेणे नव्हते. सरळ-सरळ त्या माणसाच्या तोंडाकडे दुर्लक्ष करून त्याला, "ड्रायविंग करताना ' ड्राय-फ्रुट्स ' खाण्याचे फायदे " ह्या विषयावर गोळ्या झाडण्याचे काम सुरु होते.
काय लफडा सुरु झाला आहे, हे पहायला तिथे हळू-हळू आजूबाजूचे लोक जमा होऊ लागले. जमलेले लोक साहेबांच्या निरर्थक बोलण्याला २ मिनिटातच कंटाळून मलाच सांगू लागले की, घेऊन जा ह्या साहेबांना उगी कशाला तमाशा लावलाय.
त्यावर साहेब म्हणाले, " तमाशा आम्ही नाही ह्यांनी लावलाय , " मागच्या शनिवारी दिलेले चॉकलेट कार मध्ये पघळून गेले बघा जरा डोळे उघडून ". तुम्ही जर चॉकलेट ऐवजी " बदाम-अक्रोड-काजू " ह्यांपैकी काहीही एक दिले तर ड्राइवर ला गाडी चालविताना झोप लागणार नाही आणि त्यामुळे रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी होईल. तुमच्याकडून ड्रायफ्रूट्स दिल्यामुळे किती देशहिताचे आणि पुण्याईचे काम होईल हे तुमच्या लक्षात येतेय का?"
साहेबांनी कुठला विषय कुठे नेलेला पाहून शेवटी तो टोलनाक्यावरचा माणूस, " साहेब आमचं चुकलं आम्ही तुमच्या पाया पडतो कृपया गाडी पुढे काढा. कारण , मागून लोक हॉर्न वाजवून एकमेकांच्या कानाचे पडदे फाडत आहेत ". शिवाय तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे समाजातील लोकांच्या कानाचे पडदे फाटू नये यासाठी मदत करणे आपले कर्तव्य च आहे ना ?. मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही इथून पुढे तुम्ही सजेशन दिल्याप्रमाणे, " काजू-बदाम-पिस्ता-अक्रोड-मस्तानी " हे सर्व ठेवतो. आता आमच्यावर उपकार करा आणि निघा इथून पाहिजे तर तुमचे टोल चे घेतलेले पैसे हि परत देतो. शेवटी तो मला उद्देशून म्हणाला, " काय राव तुम्ही जरा ठीकठाक दिसत आहात घेऊन जा ना ह्या हाफ म्याड माणसाला ". साहेब हाफ नाही फुल म्याड असल्याची जाण असूनही मी त्याला म्हणालो, "ये तोंड सांभाळून बोल साहेब आहेत ते माझे ."
इतक्यात त्या नाक्यावरील फळ विक्रेते, बिसलरी बाटल्या विकणारे सर्वजण तिथे जमा झाले. त्या गर्दीतील पेरू विकणाऱ्या पोरांनी साहेबांना पाहता क्षणीच ओळखलं आणि ते अंगावर येतच ओरडू लागले, " अरे हा तर तोच वेडा माणूस आहे , मागे आपल्या हातून मार खाता-खाता पळून गेलेला, पकडा ह्याला ह्या वेळेला साल्याला सोडू नका". त्यांचा राग पाहून मी पण पुरता घाबरून गेलो , अहो साहेब हे काय अजून नवीन लफडे ? आता हे फळवाले तुम्हाला का मारायचं म्हणतायत ? त्यावर साहेब म्हणाले ती एक मोठी स्टोरी आहे निवांत झाल्यावर सांगतो.
माझ्या मनात एका क्षणासाठी विचार आला की, " उगी ह्या माणसाच्या सोबत का आलोय आपण ? , साला ह्याने स्वतःच्या बदनामीचा ठेका तर उचललेलाच आहे परंतु आता सोबत असणाऱ्या माणसाची सुपारी पण घेतलीय की काय ? ".
शेवटी घाबरून मीच अहो साहेब चला आपल्याला उशीर होतोय अशी विनंती करून , मी त्या टोल नाक्यावरून आमची गाडी पुढे घेण्यासाठी कसेतरी ह्या माणसाला भाग पाडले. खरे तर त्या पेरू वाल्यांचे उपकार म्हणावं लागेल ते नसते आले तर अजून ह्यांचे " ड्राय-फ्रुट " पुरान संपायला तासभर तरी निश्चितच लागला असता.
त्यादिवशी माझ्या लक्षात आले कि , ह्या माणसाला कुठे, कधी आणि कोणत्या विषयावर अन किती वेळ बोलावे हे माहिती नाहीये. त्यांचा स्वभावच निर्लज्जम सदा सुखी..!!! असा झालाय आणि स्वभावाला औषध नसते त्यामुळे हा माणूस स्वतःच्या मेंदू मध्ये असणाऱ्या गोष्टी " सजेशन " च्या नावाखाली आजूबाजूच्या माणसावर शिंपडत फिरतोय.
परंतु अजूनही मला त्या पेरूवाल्याचं आणि साहेबांचं का बिनसलं होत ह्याबद्दल काहीही माहिती नव्हते. मी आता माझ्या मनाशी ठरविले होते की, इथून पुढे आपल्याला कितीही तहान किंवा भूक लागली तरीही गाडी थांबवू द्यायची नाही, कारण हा माणूस ह्याचे " सजेशन " चे दुकान सुरु करून आपल्याला गोत्यात आणेल.
शेवटी थोडेफार अंतर पुढे गेल्यावर साहेबांनीच ते पेरूवाले त्यांच्यावर का वैतागले आहेत हे सांगण्यास सुरुवात केली. म्हणे मागे २-३ वर्षांपूर्वी ह्यांच्या एका मंत्रालयात काम करणाऱ्या मित्राला " मुख्यमंत्री लघु उद्योग सबसिडी अनुदान योजना " ह्या प्रोजेक्ट वर काम करायचं होत त्यामुळे त्याने ह्यांची मदत मागितली होती. तेंव्हा हे साहेब रात्रदिवस , " लघु उद्योग " करणाऱ्या लोकांना पकडून-पकडून ह्या योजनेबद्दल सांगत होते परंतु ह्यांच्या सांगण्याच्या पद्धतीला घाबरून लोक ही " सबसिडी/अनुदान " चा लाभ घेण्यासाठी परत येण्याची हिम्मत करत नसत.
बघता बघता २-३ महिने गेले परंतु कुणीही हि योजना घेण्यासाठी साहेबांकडे येत नाहीये असे लक्षात आले, घरातील लोकही वैतागून गेले होते, कारण साहेब रोज छोट्या-छोट्या ' दुकानवाल्याना ' आजूबाजूच्या ' व्यवसायिकांना ' घरी बोलवून प्रोजेक्टर वर स्लाइड्स लावून त्या योजनेबद्दल सांगून त्रास देत होते. हो ! " त्रासच देत होते " , कारण साहेब जे सांगत होते त्यातील एकही अक्षर कुणालाही समजत नसे , त्यांचे इंग्लिश सर्वांच्या डोक्यावरून जायचे. शेवटी जाताना चहा-पाणी घेऊन झाल्यावर लोक साहेबांच्या बायकोला, "तुमच्या नवऱ्याला आवरा जरा " असा गोड सल्ला द्यायचे. त्यामुळे बायकोने शेवटी त्या योजनेबद्दल एकही शब्द घरात बोलायचा नाही ! जर योजनेचा विषय काढला तर, " मी कायमच माहेरी निघून जाईन " असा साहेबांना दम दिला.
परंतु साहेबांच्या डोक्यातून एखादे घेतलेले काम काढून टाकणे म्हणजे काही सोपे काम नव्हते अर्धवट काम सोडून देणे हे त्यांच्या नियमांत बसत नव्हते . साहेब हे योजनेचं काम करतच राहिले आणि त्यासाठी त्यांनी " कोड-वर्ड " वापरण्यास सुरुवात केली. त्यावेळी रोज बऱ्याच लघु-उद्योग करणाऱ्या लोकांना भेटून आल्यावर रोजच्या updates बद्दल मित्राला सांगताना , आज ८ लोकांची " गेम केलीय " , आता उद्या ६ लोकांची " गेम करायला जायचं आहे " लिस्ट तयार आहे आपल्याकडे, असे काही तरी बोलायचे .
आता इथे " गेम करायला जायच आहे " याचा त्यांनी ठरविलेला अर्थ किंवा कोड-वर्ड असा होता की, " मुख्यमंत्री लघु उद्योग योजना " ह्याबद्दल माहिती द्यायची आहे. मग काय नेहमीच फोन वर सुद्धा सहजच बोलायचे झाले की, आज पुण्यातील, " १५ लोकांची गेम करून आलोय " तू किती जणांची " गेम केली " मुंबईत आज ?
पुढे साहेब म्हणाले की , त्यांना आता " गेम करायची आहे, आपली " ' हत्यारे ' संपत आली आहेत " , नवीन " लिस्ट रेडी आहे " . हे असले शब्द रोजचेच झाले होते , ती " गेम ची भाषा " जणू त्यांच्या अंगवळणीच पडली होती.
परंतु शेवटी ते म्हणाले की , माहिती नव्हते की, ह्या " कोड-वर्ड " मध्ये बोलण्याची आम्हाला इतकी मोठी भरपाई द्यावी लागेल. ह्या असल्या गुंडगिरीच्या शब्दकोशामुळे मी आणि माझा तो मंत्रालयात काम करणारा मित्र कायमचा दुरावेल ह्याची आम्हाला कल्पना नव्हती.
ह्यांच्या कोड-वर्ड च्या अति वापरामुळे काय झाले असेल ह्याची मला थोडीफार कल्पना येऊ लागली होती. त्याचे असे होते की, " साहेबांच्या मनात काय नसायचे ते आपले चांगल्या हेतूने लोकांना मदत करायला जायचे परंतु त्यांच्याच ते नेहमी अंगलट यायचे ". इथेही तसेच काहीतरी झाले होते हे नक्की .
मागे एकदा साहेब आणि त्यांचा तो मंत्रालयात काम करणारा मित्र ह्याच टोल नाक्या जवळ लाईन मध्ये असताना भूक लागली म्हणून सहज पेरू विकत घेत होते. पेरू खरेदी करत असताना अचानक साहेबांच्या डोक्यात आले की, अरे हे पेरू विकणारे सुद्धा " लघु उद्योग " च करत आहेत. शिवाय बरेच जण दिसत आहेत तर चला मग काही हरकत नाही ह्यांची गेम करून टाकू. त्यांचा मित्रही म्हणाला, हो ! चालेल ना. "आपल्याला काय कुणाला तरी ते अनुदान घ्यायला भाग पाडायचे , मग तो पेरू विकू दे नाहीतर फुटकळ दारू ... आपले काम काय तर ती योजना समजून सांगणे ".
साहेबांनी त्या लहानग्या पेरू विकणाऱ्या पोराला विचारले, "काय रे तुम्ही कितीजण आहात पेरू विकायला ?". पोराला काही कळेना, तो म्हणाला, " का ? काय झालं साहेब ?" . अरे, " तुम्ही टोटल किती जण आहात ? " तो म्हणाला १५-१६ जण आहोत . त्यावर साहेब सहजच सोबत असणाऱ्या मित्राला म्हणाले, "चला आज ह्या सर्व १५-१६ जणांना एकत्रित बोलवून ह्यांची आजच गेम करून टाकू ". ते पोरग घाबरलं त्याला साहेबांच्या तोंडाकडे पाहून घाम फुटला. पुढे साहेब मित्राला म्हणाले, " आपली सर्व हत्यारे आणली आहेत ना एकजणही वाचलं नाही पाहिजे सर्वांची गेम झाली पाहीजे ? ". आजच आपलं टारगेट, " पेरूवाला गेम " नावाने कंप्लिट करून टाकू चला काढा आपली हत्यारे बाहेर. साहेबांना किंचितही कल्पना नव्हती की, हे प्रकरण अंगलट येईल आणि आयुष्यभर " टोल जवळ केलेला झोल " लक्षात राहील.
ते पेरूवाल पोरग हत्यारांच नाव ऐकून तिथून पळत सुटलं आरडाओरड करून त्याने त्याच्या सर्व साथीदारांना एकत्रित करून घडलेला प्रकार सांगितला. आता त्या जमलेल्या पेरूवाल्यांपैकी कितीजण नशेत नव्हते ते देवच जाणे. त्याला ते तर काय करणार बिचारे, दिवसभर उन्हात उभे राहून पेरू विकणे म्हणजे थोडाफार दारू/गांजा ह्यांचा नशा असल्याशिवाय शक्यच नाही. .
खरे तर साहेबांना इथे " हत्यारे " म्हणजे ती फालतू योजना समजून सांगण्यासाठीची फाईल / पॅम्प्लेट्स म्हणायचं होत. त्या पेरूवाल्या पोराने बाकीच्या त्याच्या सर्व साथीदारांना एकत्रित करून साहेबांबद्दल काय सांगितले देव जाणे. एकतर त्या पेरूवाल्यांपैकी बरेच जण गांजा किंवा दारू ढोसलेले होते त्यातील क्वचित एखादाच नशेत नव्हता. मग काय फुल्ल टाकून असलेले आपले ते १५-१६ पेरूवाले पहेलवान काठ्या-कुऱ्हाडी घेऊन साहेबांच्या कार पुढे उभे ठाकले. समोर उभे असणाऱ्या गॅंग ला पाहून गाडीत बसलेल्या साहेबांना आणि त्यांच्या मित्राला काहीच समजलं नाही. शिवाय त्या पेरूवाल्या अडाणी पोरांनी त्यांना बोलायचा चान्सच दिला नाही, डायरेक्ट हमला सुरु केला. गाडीच्या काचा फोडून दगडे मारण्यास सुरुवात केली. नशीब पोलिसांनी मध्यस्ती केल्यामुळे कसातरी जीव वाचवून साहेब आणि त्यांचा मित्र तिथून निसटून आपल्या-आपल्या घरी पोहचले. त्यादिवशी पासून साहेब आणि त्यांचा मित्र " कोड-वर्ड " च सोडा "नॉर्मल वर्ड " मध्ये हि एकमेकांशी बोलत नाहीत.
लेखन - अनिल पिसे.



No comments:
Post a Comment