Latest technology news and Review, Motivational Quotes, use of Online learning techniques to improve self-studies about Deep Learning and AI. Benefits of Sahajayoga meditation and experiences

Full width home advertisement

Technology

Entertainment

Post Page Advertisement [Top]


        

                                आबा









     पंढरपूर पासून १८ किमी अंतरावर असणाऱ्या तावशी नावाच्या एका छोट्याशा गावात दिंडीच्या मळ्यात आबाचा जन्म झाला. रामा पिसे नावाच्या शेतकऱ्याच्या घरी औदुंबर पिसे म्हणजे " आबा " चा जन्म झाला आणि त्याची आई अनुसया देवाघरी गेली. ह्या अभागी आबाच्या नशिबात मातृप्रेम नव्हतेच जणू ,परंतु पित्याचे ही प्रेम ह्या माणसाला आयुष्यात कधी मिळाले नाही. थोड्याच दिवसात, " घरी लहान बाळ आहे त्याला कोण सांभाळणार" हे कारण पुढे करून रामा पिसे ने दुसरे लग्न केले आणि ह्या आबाला सावत्र आई मिळाली, आई कसली कसाई मिळाली. हे तर काहीच नाही माझ्या ओळखीचे तावशीचे काही "म्हातारे" लोक असे आहेत कि, त्यांची लेकरं लग्नाला आलेली असताना ही, बायको मेल्यावर "आपल्या पोटापाण्याची आबाळ होतेय " हे कारण पुढे करून "म्हातारपणी" लग्न करून फिरतायत. असो तो काळच असा होता कि, "सावत्र आई म्हणजे एक प्रकारची कसाई" असा समाजा मध्ये रूढ झालेला समज होता. आबाच्या सावत्र आई ने ह्या बाळाला त्रास देण्यात उपाशी मारण्यात काहीही कसर सोडली नाही. मला आजपर्यंत सुटलेले कोडे म्हणजे, "ह्या जगात जर कुना माणसाची बायको मेली तर लगेच त्याला दुसरी बायको करून दिली जाते भले तो कितीहीम्हाताराअसो, परंतु याउलट जर एखाद्या बाईचा नवरा ती स्वतः तरुण असताना देवाघरी गेला तर तिला दुसरा नवरा करून देण्यास हा समाज पुढे सरसावत का नाही ? ". असो ह्या रामा पिसे च्या दुसऱ्या लग्नामुळे ह्या चिमुरड्या आबाला ना आईचे प्रेम मिळाले ना बापाची माया. आबाला उन्ह वाऱ्यात कधीही नाही मिळाली घरातील बाकीच्या लोकांची छाया, का कुणास ठाऊक एकालाही आली नाही ह्या पोरक्या लेकराची दया.
आता विधात्याने जन्म दिलाच आहे तर त्या जीवाची वाढ करण्याची जबाबदारी ही तोच घेतो असा एक अलिखित सिद्धांतच आहे. रामा पिसे च्या घरी बघता बघता एका पाठोपाठ एक महादेव आणि एकनाथ ही दोन मुले जन्माला आली, म्हणजे आता ह्या आबाला दोन सक्खे सावत्र भाऊ मिळाले. वस्तीवरील लोकांना वाटले होते कि, आई झाल्यावर, ही बाई आबालाही जवळ करेल परंतु झाले उलटेच. स्वतः ला लेकरं झाल्यावर हा आबा कधी वैतागून घर सोडून निघून जाईल यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरु केले ह्या बाईने. ह्या रामा पिसे च्या समोर ती बाई जाणून बुजून शिळ्या भाकरी आणि मिरचीचा ठेचा ह्या वर्ष वय असणाऱ्या आबाला खायला देई आणि दिवसभर रानात शेरडं सांभाळायला पाठवी. शाळा वगैरे तर दूरच परंतु ह्या आबाला कधी पायात चप्पल मिळाली नाही ना अंगावर कपडे. दिवसभर अनवाणी पायाने रानात शेळ्या चरायला न्यायाच्या आणि ह्या कामाच्या बदल्यात रात्री शिळ्या भाकरी आणि आईचा पोटभर मार खायचा. शेजारीच बसून आपली भावंडे तूप-रोटी खातात आणि आपल्या नशिबी ही शिळी भाकर का ? आपली आई जन्म देताच वारली त्यात आपला दोष होता का ? आबाला रोज वाटायचे कि, बापाने तरी प्रेमाने जवळ घ्यावे पण त्यानेही कधी आपल्याला जवळ का घेतले नाही ? असे एक-ना अनेक प्रश्न त्या चिमुकल्या जीवाला रात्रदिवस भेडसावत होते. ज्या वयात पाटी पेन्सिल हातात यायला हवी त्या वयात गुराढोरांच्या खुंट्या आणि शेण आबाच्या नशिबी आले होते. हे सर्व माझ्या सोबतच का ? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रवासात ह्या बाल मनावर खूप वाईट असे ठसे उमटत होते पण करणार काय ?

खरे तर हा रामा पिसे म्हणजे एक बागाईतदार शेतकरी चांगली शेती त्यात भरपूर पाणी पण हृदय दगडाचे असल्यामुळे त्याला कधी पाझर फुटलाच नाही. शेवटी सहनशीलता संपल्यामुळे आणि मार खाऊन थकल्यामुळे हा चिमुरडा आबा वयाच्या पाचव्या वर्षी घर सोडून पंढरपूरला निघून आला. आता " पंढरी आणि पांडुरंग " हेच आबाचे संपूर्ण जग . आपला पोटचा पोरगा घर सोडून निघून गेलाय याचा रामा पिसे आणि बाकीच्या कुणालाही काहीही फरक पडला नाही. त्यांनी शोध घेण्याचाही प्रयत्न केला नाही जणू ते आबा घर सोडून पळून जावा याची वाटच पाहत होते. आबाने घर सोडले खरे पण आता पुढे काय ? पोटाची भूक आणि डोक्यावर छत कुठून मिळेल ह्यावर विचार करण्याइतकी बुद्धी अजून ह्या चिमुकल्यामध्ये आलेली नव्हती . परंतु ही पंढरपूरची विठू माउली म्हणजे संपूर्ण जगाची आई आणि तिच्या सावलीला आलेला आबा कसा उपाशी मरेल? पंढरपुरातील उडपी हॉटेल मध्ये आबाला काम मिळाले खाऊन-पिऊन रात्री झोपण्यासाठी निवारा त्या हॉटेल मध्येच मिळाला. इकडे संपूर्ण तावशी गावाला माहिती झाले होते कि, बागाईतदार रामा पिसे चा थोरला पोरगा पंढरपुरात उडप्याच्या हॉटेल मध्ये काम करतोय . परंतु त्या निर्दयी पित्याला दुसरी बायको आणि पोर यांच्यासमोर आबा च्या बालपणावर होणारा अन्याय कधी दिसलाच नाही. हळू-हळू आबाच्या प्रामाणिकपणे काम करण्यामुळे सर्वांच्या तोंडात एकच नाव ते म्हणजे, "औदु" . शिवाय, सांगता पडेल ते काम करणे हि आबाची खासियत त्यामुळे मालकही खुश होते. सर्व गिऱ्हाईके हॉटेलात आले कि, आबा ला भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय राहत नसत , आता हेच आबाचे जग बनून गेले. छोटासा आबा चहा पासून बासुंदी पर्यंत सर्वकाही बनवायला बघून-बघून शिकला, त्याला येत नाही असे एकही काम त्या हॉटेलमध्ये नव्हते. अशाप्रकारे कायमचे बालपण हरवून बसलेल्या आबाला फक्त पांडुरंगाने प्रेमाची सावली दिली होती. पंढरी नगरीमध्ये आबाचे बालपण दुनियादारी शिकण्यात जात होते. आजवर घरच्यांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे आबाचा परस्पर नाते-संबंधावर कधीही विश्वास निमार्ण झाला नाही . आबाच्या मनाने हे घट्ट मानलेले होते कि, रिश्ते-नाते, भाऊ-भाऊकी, आई-बाप सब झुट है.
बघता-बघता उडपी हॉटेल मध्ये कामाला लागून आबाला १५ वर्षे उलटून गेली. या मागील १५ वर्षात खूप काही बदलून गेले होते, तिकडे आबांचे सावत्र भाऊ एकनाथ आणि महादेव मोठे होत होते. आबाच्या सावत्र आईने स्वतः च्या पोरांना इतके तूप-रोटी खाऊ घालूनही दोघेही शाळा अजिबात शिकले नाहीत. ते म्हणतात ना, " करावे तसे भरावे " तशी रामा पिसे ची अवस्था झाली होती. कारण रामा पिसे चा एकनाथ दारूच्या इतका आहारी गेला कि, सर्व घर कर्जात बुडून गेले. सोसायटी च्या नावाखाली इतके कर्ज काढून खड्डा पाडून ठेवलेला कि, शेवटी तो बुजवण्यासाठी आबानेच हातभार लावला. आबाचे विचार हे ठाम होते ते म्हणजे, "ह्या जगात कुणी कुणाचं नसत". त्यामुळे आबाला कधी कुणी तावशी चा भेटला आणि विचारला कि, " घरी तावशी ला कधी जाणार ? " तर आबा सरळ म्हणायचा कि , " बाप मेल्यावर " जणू काही आबाने शप्पत घेतली होती कि, जोपर्यंत रामा पिसे म्हणजे बाप मरत नाही तोपर्यंत त्या गावात पाय ठेवणार नाही . आबा शब्दाचा पक्का होता जसे बोलला तसेच वागला खरंच बाप मरे पर्यंत कधी त्याच्या दारात गेला नाही उलट "रामा पिसे" आबाच्या घरी नेहमी यायचा आणि आबाच्याच दारात तो एके दिवशी मरून गेला.
आबाला जवळून लहानपणापासून पाहणारा ओळखणारा पाहूना-माणूस म्हणजे, "कांता माळी ". कांता माळी पंढरपुरातच चौफळ्यात हार आणि गजरे विकण्याची पाटी लावायचा. मागील १५ वर्षात आबाने थोडाफार पैसा ही साठविला होता आणि संतपेठ नावाच्या झोपडपट्टी मध्ये एक छोटेसे झोपडे ही बांधले होते. आता आबाचे लग्नाचे वय झाले होते परंतु ज्याच्या आगे-पीछे कुणीही नाही आणि शिवाय हॉटेल मध्ये काम करणाऱ्या माणसाला कोण पोरगी देणार हा एक मोठा प्रश्न होता. शेवटी कांता माळ्याने मध्यस्ती करून आबाचे एका "मंगल नामदेव राऊत " नावाच्या गरीब घरातील मुलीसोबत लग्न लावून दिले. आबाच नशीब चांगलं कि, बायको त्याला चांगली मनमिळावू आणि कष्ट करणारी मिळाली बिचारी दिवसभर चुडे बनविण्याचं काम करी. जे काही कामातून मिळेल ते त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी पुरेशे होते. सर्व काही व्यवस्थित आनंदात सुरु होते, आबाने स्वतः चे एक असे वेगळे जग निर्माण केले होते. परंतु ह्या सर्व गोष्टीना नजर लागली दरम्यान आबाला संसारात मन रमेनास झालं. त्यामुळे पहिल्या मुलाचा जन्म झाल्यावर जो आबा पंढरपूरातून गायब झाला, तो परत आला तो मुलगा चालू लागल्यावरचं. मधल्या काळात आबाच्या बायकोला बरेच भाऊकीतील लोक म्हणायचे कि, "काय त्या माणसाची वाट पाहते करून टाक दुसरे लग्न" , पण मंगल ने कधीही कुणाचे ऐकून कोणतेही पाऊल उचलले नाही . कारण आबाच्या बायकोचा पांडुरंगावर पूर्ण विश्वास होता आज ना उद्या माझा नवरा संसाराला लागेल असे तिचे मन तिला नेहमी सांगायचे. शिवाय ती पक्के जाणून होती , कि ह्या जगात नवरा-बायकोला तोडणारी माणसे खूप असतात परंतु जोडणारी माणसे खूप कमी आहेत. आबाला भटकंती करण्याचा गावोगाव फिरण्याचा खूप नाद लागलेला. थोडे दिवस काम करायचे थोडेफार पैसे जमा करायचे आणि कुठल्यातरी नवीन गावी निघून जायचं, मग जवळचे पैसे संपे पर्यंत परत घरी यायचं नाही असे बरेच दिवस चालले. आता दुसरा मुलगा झाला तरीही आबा एके-ठिकाणी थांबेना. एकदा घरातून गेला हा माणूस कि - महिने घराकडे परत येत नसे'. बिचारी बायको त्या पोरांना सांभाळत चुडे करायचं काम करायची. शेवटी तिची प्रार्थना पांडुरंगाने ऐकली आणि तिसरा मुलगा झाल्यापासून आबा परत पहिल्यासारखा स्थिर झाला . घराकडे लक्ष देऊ लागला आणि नीट संसार करू लागला.
ज्यांनी आबाला त्या काळी पाहिले होते ते लोक नेहमी आबाला म्हणत असत कि, तिसऱ्या मुलाचा पायगुण चांगला होता म्हणून आबांची गाडी रुळावर आली . हळू हळू आबा माणसे जोडण्यास शिकला मग तावशी गावातील बरीच भावकी मंडळीची घरी ये-जा वाढली. सावत्र आई ही येत-जात असे. तिला आता दिसायचं कमी आले होते थकली होती ती. ज्यांनी आबाला गरज होती तेंव्हा विचारले ही नव्हते असेही पाहुणे मंडळी येत असत. आबाकडे सर्वांचं स्वागत असे त्यामुळे त्यांना त्यांच्या पूर्वीच्या वागणुकीचा पश्चताप होत असे . आबाचे स्वतःचे थोडे नियम होते आणि ते नियम त्यांनी जन्मभर तंतोतंत पाळले. " अंथरून पाहूनच पाय पसरावे ", ह्या विचाराचा आबा जीवनात कधीही कुणाकडे उसने पैसे घेतला नाही. उलट बऱ्याच लोकांनी आबाकडून घेतलेले पैसे परत केले नाहीत. आबाच्या जीवनात पैसे देणे-घेणे संबंधी असे बरेच प्रसंग आले त्यात त्यांनी खूप काही शिकले. " जिथे मान नाही तिथे कधीही जायचं नाही ", हा नियम तर खूप काटेकोर पणे आबाने पाळला. कुणी अन्न वाया घालविताना दिसले तर आबा नेहमी म्हणायचा कि, "खाऊन माजा; पण टाकून माजू नका ". एकदा तर पोरांना अन्नाचं महत्व कळावं म्हणून घरातील विटलेली डाळीची भाजी त्यावर फेस आलेला असतानाही आबाने घरच्या सगळ्यांसमोर गटागटा पिऊन टाकलेली. त्या दिवसापासून आबाच्या घरच्यांनीही कधीही अन्न वाया घालविले नाही.
हळू हळू दिवस पुढे जात होते आबांची मुलेही मोठी होत होती आणि झोपडी रूपांतर आता पत्र्याच्या घरात झाले होते. अजून गल्लीत पाण्याचा नळ आणि लाईट आली नव्हती. आबाच्या घरात दोघेही नवरा बायको खूप कष्ट करत, शिवाय मुलेही कुठे गजरे/हार ओवून जमतील तितका पैश्यांचा हातभार लावत. एकंदरीत कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते. आबा आता उडप्याकडे काम करत नव्हते तर शिवाजी चौकातील डांगे मालकाच्या हॉटेलमध्ये काम करायचे. तिथेही आयुष्यातील बराच काळ आबाने प्रामाणिकपणे काम केले. त्या हॉटेलचा मालक कधीतरी दुकानी यायचा कारण, सर्व धंदा आबा आणि त्यांचे - जोडीदार सांभाळायचे. पंढरपुरातील वडा-पाव आणि भज्यांसाठी ते दुकान, " हॉटेल कॉर्नर " नावाने खूप फेमस होते, पंढरपुरात राहून तिथल्या वडा पाव अन भज्यांची चव चाखली नाही असा क्वचितच एखादा इसम असावा. माणसांची तुडुंब गर्दी असायची, गिऱ्हाईकाला नेहमी कमीत कमी २० मिनिट वेटिंग ला थांबावे लागे. आबा रोज संध्याकाळी कामावर जायचा ते हॉटेल दुपारी ते रात्री १२ सुरु असायचे. आबा रात्री १२- ला दुकान बंद करून घरी यायचे आणि सकाळी लवकर उठून पाणी भरायला वेगवेगळ्या नळांवर भटकायचे. आबा कधीही आळसाला साथ देत नसे. सकाळी अंघोळ वगैरे झाल्यावर अन्याबाच्या अड्ड्यात लाकडं फोडायला जात असे. अश्या पद्धतीने सर्व काही ठीक ठाक सुरु होते. आबाच्या जीवनात, "दुःख भरे दिन बिते रे भैया" गाण्याप्रमाणे काळ येऊ लागला होता. घरात लाईट-टीव्ही-टेप वगैरे आले होते पोर हातातोंडाला आली होती. मोठ्या पोराचं लग्न कुकाजी पाटील वाढ्यात मोठ्या थाटामाटाने केलं. थोरला पोरगा बरीच वेगवेगळी कामे करून ह्या संसाराच्या भवसागराला तारण्याचा अतोनात प्रयत्न करत होता. मधला पोरगा सुद्धा एका 'अविष्कार कलेक्शन ' नावाच्या कपड्याच्या दुकानात काम करून संसाराचा गाढा ओढायला मदत करत असे. शिवाय बायको चुडे बनवायची आणि वेगवेगळ्या जत्रेत (मायाक्का चिंचणी, ज्योतिबा, आषाढ /कार्तिक वारी ) हे चुडे विकायलाही जायची. ह्या चुडे विकण्याच्या कामात आबा आणि आबाची मुलेही मदत करत असत. आबांची बायको चुडेवाली मंगलबाई म्हणूनच ओळखली जात असे. ह्या चुडेवाल्या मंगलबाईने गल्लीतल्या बऱ्याच बायकांना चुडे बनवायला शिकवून स्वतःच्या पायावर उभे केले. त्यामुळे ह्या बायका जरी त्यांचे नवरे दारुडे असले तरी ताठ मानेने स्वतःच्या कमाईवर जगायला शिकल्या.
अचानक डांगे मालक हॉटेल वगैरे सर्व विकून पंढरपूर सोडून निघून गेला. आता हॉटेलचं बंद झाल्यामुळे सर्व कामगार परत निवांत कामाविना भटकू लागले. आबा आता फक्त लाकडे फोडायला अड्ड्यात जायचा पण त्याने घर भागत नसे. आबाच्या जीवनातील ते - महिने खूप वाईट होते. एके दिवशी पांडुरंगानेच आबाच्या सोबत काम करणाऱ्या एका हरिभाऊ नावाच्या अवलिला घरी पाठविले. तो हरिमामा खरे तर आबाच्या हाताखाली काम करून पक्का झालेला आणि त्याच्या मनात आबा बद्दल खूप आदर होता. तो बोलत- बोलत सहजच खूप महत्वाचं बोलून गेला. तो म्हणाला, "आपल्या त्या डांगे मालकाला कुणीही ओळखत नव्हतं. त्याचा धंदा मागील १५-२० वर्षांपासून आपणच संभाळायचो. सर्व गिऱ्हाईक आपल्या तोंडाकडे पाहून यायचे. शिवाय माल कसा बनवायचा आणि कसा विकायचा हे आपल्यालाच माहिती होते ". आबा म्हणाला, "हो ते तर खरेच आहे". त्यावर हरीमामा म्हणाला, " तर आबा आपणच सुरु करू वडा -पाव आणि भजे विकायला . जी क्वालिटी त्या डांगे मालकाच्या हॉटेल मध्ये होती तीच आपण टिकवून ठेवायची ". मग काय आबाने एक गाडा भाड्याने घेतला आणि सर्व सामान - किलो आणून सुरुवात केली. पहिल्याच दिवशी लोक तुटून पडले आणि हळू-हळू धंद्यावर जम बसू लागला. थोड्याच दिवसात आबाने स्वतःचा नवीन गाडा बनवून घेतला आणि आपल्या थोरल्या पोराला हार विकण्याचे बंद करून आपल्याच गाड्यावर काम शिक म्हणून सांगितले. शिवाय मधला पोरगाही कापड दुकानातील काम सोडून वडापाव गाड्यावर काम करू लागला. खरे तर तेंव्हा पासून आबाच्या जीवनात सुख भरे दिन आले. धंदा जोरात सुरु झाला हळू-हळू गावाबाहेर प्लॉट घेतला. सर्व काही मनाप्रमाणे सुरु झालं दुसऱ्या पोराचही लग्न धूम धडाक्यात आबाने लावून दिले.
ह्याच दिवसांमध्ये आबाच्या साडू च्या किडन्या फेल झाल्या होत्या. तो साडू वायरमन होता आणि खूप चांगला माणूस होता. त्यालाही आबाच्या घराशिवाय जवळचे असे कुणी नव्हते. आबाच्या थोरल्या पोराचा ह्या वायरमन काका वर खूप जीव होता. थोरला पोरगा चक्क त्या काकांना स्वतः ची किडनी ही द्यायला तयार होता. त्या साडू च्या आजारपणात जवळ-जवळ सर्व खर्च आबाने स्वतः केला होता. कुणी कधी हेंद्राबाद ला चांगला किडनी चा दवाखाना आहे म्हणले कि, लगेच आबा भाड्याची गाडी करून तिकडे न्यायाचे. असे बरेच दवाखाने आणि उपचार करण्याचा अतोनात प्रयत्न केला परंतु यश आले नाही. शेवटी त्या वायरमन साडूने आबाच्याच घरी प्राण सोडले. ह्या सर्व उपचारा दरम्यान आबाने खूप खर्च केलेला आता त्यांच्या घराचीही जबाबदारी आबाच्या घरच्यांवर आलेली. त्या साडूची लहान-लहान मुले आहेत आणि घरात कमविता कुणी नाहीये म्हणून त्यांच्या जागेवर त्यांच्या बायकोला कामावर घ्यावे यासाठीही आबा आणि आबाच्या मुलांनी खूप खटाटोप केली. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले त्या वायरमन च्या जागी mseb मध्ये त्यांच्या बायकोला शिपाई म्हणून रुजू करण्यात आले. शिवाय mseb कडून त्यांचे फंडाचे पैसेही मिळवून देण्यासाठी आबाच्या मुलांनी बरेच प्रयत्न केले.
काही दिवसांनी जेंव्हा वायरमन साडू चे पैसे त्यांच्या बायकोला मिळाले तेंव्हा आबाने सहज एक मेहुणा ह्या नात्याने मेहुणी ला, "आता तुमच्याकडे पैसे आले आहेत, आता तुम्ही माझे तुमच्या नवऱ्याच्या आजारपणात खर्च केलेले पैसे परत दिले तर खूप बरे होईल " असे म्हणाले. तर पैश्याबद्दल असे म्हंटल्यावर त्या मेहुणीने दिलेले जहरी उत्तर आबाच्या मनाला खूप लागले. ती सरळ म्हणाली, "ज्याच्या आजारपणासाठी पैसे खर्च केले त्यालाच जाऊन तुमचे पैसे परत मागा ". त्या दिवसानंतर आबाने परत कधीही त्या मेहुणीच्या घराची पायरी चढली नाही आणि तिचे तोंडही पाहिले नाही. असो, "ज्याची नीती त्याच्या सोबत" पांडुरंगाच्या कृपेत आबाला कधीही पैस्याची कमतरता भासली नाही. आता आबाची दोन मुलेच वडापाव दुकान चालवीत होती आणि आबा सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले होते. वयही खूप वाढले होते त्यामुळे शरीर थकून गेले होते. संतपेठ झोपडपट्टी मधले घर आता वडापाव च्या दुकानाचे सामान ठेवण्याचे स्टोर रूम केले होते आणि छान पैकी गावाबाहेर घेतलेल्या प्लॉट वर सुंदर घर बांधले होते. डोळ्यासमोर आपली मुले मोठी झालेली आबाने पाहिली शिवाय नातवंडे अंगा खांद्यावर खेळविली. जीवनातील सर्व प्रकारचे चढउतार आणि वेगवेगळ्या प्रकारची माणसे आबाला भेटली आणि वेगवेगळे अनुभव गाठीशी बांधून निघून गेली. पंढरपुरात १३ एप्रिल २०१७ ला आंबेडकर जयंती ची मिरवणूक होती आणि आबाचा थोरला नातू "सोन्या" मिरवणूक बघायला जायचं म्हणून मागे लागलेला तर आबाने त्याला सांगितलेले कि, "उद्या माझीच मिरवणूक काढायची आहे त्याला ये ". जणूकाही आपण उद्या जाणार आहोत हे माहिती असल्यासारखे आबा नातूला बोलून बसलेला आणि खरंच आबा अचानक म्हणजे १४ एप्रिल २०१७ ला सकाळी-सकाळी झोपेतच देवाघरी निघून गेला.
" आबा " म्हणजे माझे जन्मदाते बाबा त्यांचा जन्मापासूनचा संपूर्ण खडतर असा प्रवास थोडक्यात मांडलेली हि एक सत्यकथा. आज आबांना जाऊन वर्ष झाली त्यांच्या तिसऱ्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.....
लेखन- अनिल पिसे.



No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]