“फटाक्यांची पिशवी”
कधी-कधी भूतकाळात चित्त टाकून पाहिले तर माझ्या लक्षात येते कि, बालपणी माझ्या संपर्कात आलेल्या बऱ्याच लोकांनी आपला पुरेपूर वापर करून घेतला आणि काम झाल्यावर सोडून दिले. मी जन्मापासूनच खूप महत्वकांक्षी होतो म्हणजे मला एखादे काम दिसले कि, आपल्याला पण हे जमले पाहिजे असे वाटायचे. उदाहरणार्थ, आमच्या गल्लीत एक टेलर होता त्याच्या दुकानाचे नाव होते "प्रॉमिस टेलर" त्याला आणि त्याच्या कामाला पाहिले कि, वाटायचे यार आपण सुद्धा टेलर काम शिकायला पाहिजे परंतु त्याने आणि त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांनी माझ्याकडून टेलर काम शिकविण्याच्या बदल्यातून खूप काही त्यांची वैयक्तिक कामे करून घेतली पण मला साधी फाटलेल्या शर्टाला टीप मारायला सुद्धा शिकविले नाही. खरंच त्यांचे सर्वांचे खूप उपकार झाले माझ्यावर कि, त्यांनी मला टेलर काम शिकविले नाही, नाहीतर आज मी पंढरपुरात कपडे शिवत बसलो असतो. त्याकाळी आमच्या गल्लीत क्वचित एखाद्या घरात सायकल पहायला मिळायची, फक्त एक घर असे होते कि, त्यांचं सायकल भाड्याने द्यायचं दुकान होत त्यांच्या दुकानात ८-१० सायकली होत्या. दररोज
सकाळी त्या सायकल वाल्याच्या घराजवळ थांबून त्याच सर्व आवरून होण्याची आम्ही सर्व लहान मुले वाट
पाहायचो, कारण त्याचे दुकान घरापासून थोड्या अंतरावर होते . आम्ही सर्वजण त्यांच्या एक-एक सायकली घरापासून दुकानापर्यंत पोहचविण्याच फुकटच काम करायचो, जेणेकरून तेव्हडंच ४-५ मिनिट सायकल हाताळायला मिळेल. परंतु मला वाटायचे कि, हे असे शिकलो तर सायकल शिकायला बरेच दिवस लागतील त्यामुळे मी लवकरात लवकर सायकल शिकण्यासाठी खूप धडपड करायचो. त्याच सायकलवाल्याचा एक पोरगा माझी हि सायकल शिकण्यासाठी सुरु असणारी धडपड जाणून होता. त्यामुळे त्यानेही माझा सायकल शिकविण्याच्या नावाखाली बराच वापर केला. माळी असल्यामुळे त्यांचा धंदा फुले विकण्याचा होता , रोज संध्याकाळी फुलांचे पुडे (फुलांचा रतीब ) देण्यासाठी तो मला त्याच्यासोबत घेऊन जायचा. दररोज संध्याकाळी उत्पात गल्लीतील जवळजवळ ६०-७० घरांमध्ये फुलांचे पुडे देण्याचे काम मी अविरत पणे करत-करत कधी सायकल शिकलो समजले सुद्धा नाही. तो
पोरगा सायकलच्या सीटवर निवांत बसलेला असायचा आणि मी पुढे नळीवरुण सायकलचा पायंडल मारायचो. आज बरीच माझी ब्राम्हणांची मित्र-मंडळी उत्पात गल्लीत राहणारी आहेत त्यांना भेटायला गेल्यावर हे ध्यानात येतेय कि, लहानपणी फक्त सायकल शिकण्यासाठी मी ह्या गल्लीत यायचो, खरे तर आपला वापर केला जायचा . असेच बऱ्याच जणांनी रिक्शा शिकवितो म्हणून वापरले पण मनापासून कधी शिकविले नाही. शेजारच्या घरात एक फोटोग्राफर राहतं होता त्याने तर फोटो काढायला शिकवण्याच्या नावाखाली कितीतरी लग्ने /बारसे/मुंज असले कार्यक्रम माझ्या गळ्यात कॅमेऱ्याची मोकळी बॅग अडकवून पार पाडलीत. मी खूपच किरकिर केली तर तो मला त्याच्या कॅमेऱ्यातून फ्लॅश मारायला लावून फोटोग्राफी शिकण्याचा खोटा आनंद द्यायचं नाटक करायचा. आता कधी त्या गल्लीत गेलो कि वाटते , बरे झाले त्या लोकांनी मला शिकविले नाही. खरे तर माझ्यातील विद्यार्थी टेलर काम, सायकल, रिक्शा ह्या सर्व कला स्वतः प्रयत्न करून शिकला कारण त्यात काहीही अवघड नव्हते. परंतु जेंव्हा आपल्याला त्या सर्व गोष्टी नव्या होत्या तेंव्हा त्यातील जाणकार लोकांनी आपला फक्त वापरचं केला ह्याच न राहवून आज हि वाईट वाटत . असो पांडुरंग त्यांना सुखी ठेवो कारण त्याकाळी त्यांनी मला जर त्यांच्यातील कला मनापासून शिकविल्या असत्या तर कदाचित मी माझे शिक्षण सोडून तेच काम केले असते. जगात खूप कमी लोक असे असतात कि, ते आपणहून निरपेक्ष हेतूने दुसऱ्याला आपल्यातील कला शिकवितात.
मी ६ वी ला असेन तेंव्हा माझा थोरला भाऊ आठवडी बाजारांमध्ये किराणा दुकान चालवत असे. तालुक्यातील छोट्या छोट्या गावांमध्ये जसे कि , रविवारी
सुस्ते ह्या गावात, सोमवारी फुलचिंचोली तर मंगळवारी पंढरपूरचा बाजार भरायचा. थोरल्या भावाच्या दुकानात हातभार लावण्यासाठी म्हणून मी सुद्धा त्याच्यासोबत हे बाजार करायचो. पंढरपुरातील बाजारपेठेत प्रिन्स गांधी नावाचे एक होलसेल व्यापारी आहेत त्यांच्या दुकानातून होलसेल भावात बिस्कीट च्या पुड्याचा बॉक्स घेऊन मी बाजारात विकायचो. "पायले-जी" नावाचे
नकली बिस्कीट असायचे म्हणजे, "पारले-जी" ऐवजी "पायले-जी" लिहिलेले असायचे बाकी पुड्यावरील चित्र वगैरे सर्वकाही सेम असायचे. बाजारातील गिर्हाईके गरीब व अडाणी असल्यामुळे कमी
पैस्यात आमचे "पायले-जी" ह्या गरिबांना "पारले-जी" चा आनंद देत असावे. ह्या आठवडी बाजारामुळे आपल्याला गावोगाव फिरायला मिळतय आणि चार पैसे पण हातात खेळतात त्यामुळे मला आवडायचं. हा बिस्कीट च्या पुड्याचा धंद्या म्हणावा तितका सोपा नव्हता बराच वेळ उन्हात उभे राहायला लागायचे. खेड्यातील बाजार तसेही
दुपारनंतर भरायचे आणि माझी शाळा सकाळी ७.३० ते १२ वाजेपर्यंत असायची त्यामुळे शाळा सुटल्यावर बाजारला जाऊन २-३ तास ओरडले तर एका बॉक्स मागे १०० रुपये मिळायचे.
बिस्कीट विकताना माझ्या डोळ्यासमोर एक व्यापारी प्रेरणास्थान म्हणून होते त्यांचं नाव सुभाष झाडबुके होते ते आता ह्यात नाहीत. त्यांना आम्ही अप्पा म्हणायचो, पक्का वाणी माणूस परंतु बोलक्या स्वभावाचा असल्यामुळे आपलासा झालेला. त्यांनीच तर माझ्या भावाला त्याचा पुरेपूर वापर करून घेऊन हळू-हळू बाजारातील धंदा शिकविला होता. हे अप्पा दिवसातून १०-१५ चारमिनार सिगारेट ची पाकिटे ओढायचे शिवाय थोडाफार माझा लाड करायचं नाटक करून त्यांची बरीच कामे माझ्याकडून करून घेयायचें. तर दर रविवारी आम्ही सुस्ते ह्या गावी बाजारासाठी जायचो, भोसले ट्रान्सपोर्ट ची ट्रक असायची त्यात नेहमीची व्यापारी मंडळी भेटायची त्यांना पाहून थोडिफार प्रेरणा मिळायची. सुस्ते गावातील बाजार दुपारी ३ नंतर खऱ्या अर्थाने भरायचा परंतु आम्ही सकाळी ९ पर्यन्त सुस्ते मध्ये पोहोचलेलो असायचो. ह्या अप्पा वाण्याचा कुणी एक नातलग सुस्ते पासून जवळ म्हणजे किमान ४ किमी अंतर असणाऱ्या तारापूर ह्या गावी राहायचा त्याचे नाव बाळासाहेब झाडबुके होते. ह्या नातलगाचे तारापुरात किराणा मालाचे दुकान होते शिवाय त्यांच्याकडे रॉकेल सुद्धा विकत मिळायचे. सुस्ते मधून तारापूर ला जायला राणा-रानातून एक पायवाट होती कदाचित ते अंतर कमी असेल परंतु माझ्या वयापुढे ते अंतर खूप जास्त होते कारण तेंव्हा मी फक्त १०-११ वर्षाचा असेल. हे अप्पा वाणी नामक इसम मला गोड बोलून दर रविवारी सुस्ते हुन तारापूर ला रॉकेल आणायला पाठवायचे कारण त्याकाळी घरोघरी रॉकेल वर चालणारे स्टोव्ह असायचे. मला म्हणायचे कि, तुझा बिस्कीट विकण्याचा धंदा दुपारनंतर सुरु होतोय तोपर्यन्त रॉकेल घेऊन ये. तारापूरला गेलो कि, त्या दुकानवाल्या काकू नेहमी काही तरी खाऊ खायला द्यायच्या त्यामुळे ते पण एक आकर्षण होते. मी आपला चालत-चालत निघायचो जाताना काही वाटत नसे, कारण रिकाम्या हाताने जायचो परंतु येताना दोन्ही हातात ५-५ लिटर चे २ रॉकेल चे डब्बे असायचे. ओझ्याने खूप हात भरून यायचे त्यामुळे थांबत-थांबत ते १० लिटर रॉकेल घेऊन कसाबसा परत यायचो. त्या पायवाटेवरून जाताना खूप छान असे निसर्ग सौन्दर्य होते त्यामुळे तो रस्ता आणि तो प्रवास कधीही विसरू शकत नाही . सुस्ते पासून तारापूर ला जाताना मध्ये एक वाहत्या पाण्याचा ओढा होता तिथे येता-जाता दमलेल्या आणि गरम झालेल्या पायांना गार पाण्याचा मुलामा मिळायचा मस्त वाटायचं . तारापूरहून आल्यावर आपला बिस्कीट चा बॉक्स उघडून ३-५ ह्या वेळेत, "पारले-पारले" पारले असे ओरडून ते बिस्कीट चे पुडे विकायचो.
असेच एकदा दिवाळी जवळ आली होती आणि दिवाळीच्या अगोदरचा सुस्ते चा सणाचा बाजार होता. नेहमीप्रमाणे मी सुस्ते हुन तारापूरला रॉकेल आणायला निघालो जाताना थोरल्या भावाने ताकीद दिली होती कि, सणाचा बाजार आहे लवकर ये आज जास्त धंदा असतो . आज जरा चालण्याचा वेग वाढवावा लागला होता रॉकेल च्या दुकानात पोहचल्यावर त्या दुकानवाल्या काकूंनी दिवाळीचा फराळ खायला दिला. दुकानाची दिवाळीमुळे सुंदर सजावट केलेली होती आणि आज त्यांच्या दुकानात फटाके सुद्धा विकायला होते. मला त्या फटाक्यांबद्दल खूप आकर्षण होते माझे डोळे त्या फटाक्यांच्या वेगवेगळ्या बॉक्स/रंग/प्रकार ह्यावरून भिरभिरू लागले. सहज मनात आले आणि मी त्यांना सांगितले कि, अप्पा वाणी यांनी थोडे फटाके सुद्धा द्यायला सांगितले आहेत. त्यांनी माझ्याकडे एका प्लास्टिक पिशवी मध्ये सर्व प्रकारचे थोडे-थोडे फटाके दिले आणि मी तिथून दोन्ही हातात १-१ रॉकेल चे डबडे आणि ती फटाक्यांची पिशवी घेऊन सुस्तेच्या दिशेने निघालो. मला खूप आनंद झालेला परंतु थोडे वाईट ह्याचे वाटत होते कि,अप्पा वाण्याने सांगितलेले नसताना ही आपण खोटे बोलून फटाके मागून घेतले आहेत. पण परत माझेच मन मला समजून सांगायचे कि, आपण अप्पा वाण्याला सांगू कि, मी तुमचे नाव सांगून फटाके आणले आहेत ते काही म्हणणार नाहीत ते आपला नेहमीच लाड करतात. ह्या तारापूर ते सुस्ते पायवाटेवरून चालताना मी दिवाळी साजरी करण्याबद्दल खूप
स्वप्ने रंगवू लागलो कारण पहिल्यान्दा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे फटाके मला ह्या दिवाळी ला मिळाले होते. कधी एकदा हा बाजार संपतोय आणि मी घरी जातोय आणि माझ्या गल्लीतील मित्रांना हि "फटाक्यांची पिशवी" दाखवितोय हे आणि असे अनेक नाना प्रकारचे विचार माझ्या मनात घोळू लागले. आज नेहमी प्रमाणे रॉकेल च्या डब्यामुळे हाताला रुतत हि नव्हते आणि हात दुखत हि नव्हते कारण मनात आनंदाच्या पाखळ्या फुलत होत्या. मी दर ५-७ मिनिटाला ती "फटाक्यांची पिशवी" ह्या हातातून त्या हातात असे करत-करत येत होतो. ह्या प्रवासात कितीतरी वेळा मी त्या पिशवीतील सर्व फटाके डोळे भरून पाहिले असतील . शेवटी पोहचलो एकदाची बाजारात आणि आपला बॉक्स उघडून ३-५ ह्या वेळेत, "पारले पारले पारले", असे ओरडून ते बिस्कीट चे पुडे विकले. ह्या फटाक्यांच्या पिशवीच्या आनंदामुळे माझ्या नजरेत आजचा बाजार काही वेगळाच होता. त्यामुळे आज हे बिस्कीट चे पुडे विकताना कडक उन्ह असूनही मला खूप सावली असल्यासारखे वाटत होते, कारण मन आनंदाने बहरून गेले होते. खरंच लहानपणी किती छोट्या-छोट्या गोष्टींचं अप्रूप वाटायचं ना ?
बाजार संपत आला आणि माझे बिस्कीट चे पुडे सुद्धा संपून गेले. आता ठरविल्याप्रमाणे, मला वाटत होते कि , त्या अप्पा वाण्याला फटाक्यांबद्दल सांगून टाकू म्हणजे आपल्या मनावरील, " खोटे बोलून फटाके मागून आणले
" हा भार थोडाफार कमी होईल. परंतु जेंव्हा मी अप्पा वाण्याकडे निघालो तेंव्हा पाहिले तर मी आणलेली "फटाक्यांची पिशवी" माझ्यासोबत नव्हती. मी खूप शोधाशोध केली पण ती पिशवी काही दिसेना. खूप-खूप आठविण्याचा प्रयत्न केला परंतु ती पिशवी कुठे विसरलो हे आठवत नव्हते. दरम्यान दुपारपासून रंगविलेली सर्व स्वप्ने काही नजरेसमोरून जाण्यास तयार नव्हती ..... खूप अस्वस्थ झालो, माझी फटाक्याची पिशवी गेली कुठे हा विचार मला सतावत होता. बराच वेळ विचार केल्यावर लक्षात आले कि, येताना आपल्या हातात दोन ५-५ लिटर रॉकेल चे डब्बे होते आणि ती पिशवी सुद्धा होती . परंतु जेंव्हा तो पाण्याचा ओढा आला ज्याचे पाणी आपल्या पायाला दरवेळी क्षणिक थंडावा देते तिथेपर्यन्त आपल्यासोबत सर्वकाही होते. पण नेहमी आपण एक रॉकेल चा डबा अलीकडेच ठेवून दुसरा ओढ्याच्या पलीकडच्या बाजूला ठेवून येतो, कारण एका हातानं आपली पॅन्ट भिजू नये म्हणून पकडावी लागते. शिवाय पाण्यात पडण्याची भीती असल्यामुळे नेहमीप्रमाणे एक-एक रॉकेलचा डबा नेण्याच्या नादात कदाचित आज आपण ती " फटाक्याची पिशवी " ओढ्याच्या अलीकडे अथवा पलीकडे विसरून आलोय हे माझ्या लक्षात आले. त्यादिवशी लवकर बाजाराला पोहचण्याची घाई आणि मनातील वेगवगळ्या विचारांची गर्दी ह्यामुळे ती फटाक्यांची पिशवी मी हरवून बसलो होतो. आता बाजार संपला होता आणि लोक जिकडे तिकडे निघून गेले होते आणि आम्हाला सुद्धा पंढरपूरला परत निघायचं होत. माझं मन परत-परत मला सांगत होत कि, पळत-पळत त्या ओढ्याजवळ जा आणि ती पिशवी घेऊन ये. थोड्याच वेळात हेच मन सांगायचे कि, कुणीतरी घेऊन गेले असेल ती पिशवी, जाऊ दे आपल्या नशिबात नव्हती.
त्यादिवशी फक्त मनातल्या मनात खूप फटाके उडविले आणि मनाला हे पण समजून सांगितले कि, इथून पुढे खोटे बोलून कुणाकडून काहीही घ्यायचे नाही कारण ते त्या फटाक्याच्या पिशवी प्रमाणे वापर न होता हरवून जाते. हे १५-२० वर्षांपूर्वी माझ्यासोबत घडले परंतु आज सहज माझी नजर घरात आणलेल्या फटाक्याच्या पिशवीवर पडली आणि हे " सुस्ते-तारापूर " पासून "पायले -पारले" सर्व काही डोळ्यासमोरून वाहू लागले. खरंच ती
" फटाक्यांची पिशवी " माझ्यासाठी अनमोल होती, आज खूप सारे फटाके जवळ आहेत परंतु ह्या फटाक्यांना त्या हरविलेल्या बालपणाची आणि पिशवीतील फटाक्यांची सर येणार नाही. असो आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा.
लेखन-अनिल पिसे.



No comments:
Post a Comment