Latest technology news and Review, Motivational Quotes, use of Online learning techniques to improve self-studies about Deep Learning and AI. Benefits of Sahajayoga meditation and experiences

Full width home advertisement

Technology

Entertainment

Post Page Advertisement [Top]



            माझ्या माहितीप्रमाणे जागतिक पातळीवर, सायकलिंग वीक, वूमन्स वीक, वाइल्ड लाइफ वीक, वैलेंटाइन वीक हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जाणारे वीक आहेत. निश्चितच इंडिया मध्ये स्वतःच्या गरजेनुसार हे वीक साजरे करण्यामागचे उद्दीष्ट्ये प्रत्येक ठिकाणी बदलले जाते. बऱ्याच वेळा असे निदर्शनास येते की, आपल्या ऑफिस मधील काही ' नमुने ' दिलेले काम सोडून " एक्स्ट्रा-करिकुलर एक्टिविटीज " च्या नावाखाली बाकीच्या गोष्टीं करण्यात अगदी मनापासून व्यस्त असतात. त्यामध्ये बिनकामी साहेब लोक आपण ऑफिस मध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचे दिवे लावतोय हे दाखवण्यासाठी कोणतेही ' डे ' साजरे करण्यास परवानग्या देत राहतात. जास्तच दिखावा करायची सवय असल्यामुळे काही अतिउत्साही ' कामचुकार ' लोक 'डे ' ऐवजी अक्खा वीक साजरा करताना पहायला मिळतात. असो, ज्याची-त्याची काम करण्याची सवय ...आपण याठिकाणी आमच्या गोरे साहेबांनी जागतिक " स्वछता वीक " कसा साजरा केला ते पाहू.

           गोरे साहेबांच्या फुकटचे सजेशन देण्याच्या धंद्यामुळे पुण्यातील बऱ्याच ठिकाणी चांगल्या ओळखी आहेत. साहेबांना जागतिक " स्वछता वीक " निमित्त ' विद्यार्थी दशेत स्वच्छतेचे महत्व ' ह्या विषयावर व्याखाने देण्यासाठी बरीच निमंत्रणे आली होती. अजिबात इच्छा नव्हती तरी देखील त्यांच्यासोबत फिरायची आणि विनाकारण त्यांचं भाषण ऐकण्याची वेळ माझ्यावर आली होती. तर साहेबांचं पहिलं भाषण पुण्यातीलच एका नामवंत विद्यापीठाच्या मुलांच्या हॉस्टेल मध्ये आयोजित करण्यात आले होते . त्या कार्यक्रमास आम्ही वेळेत पोहचलो होतो, आज साहेब एखाद्या मंत्र्यासारखे दिसत होते कारण त्यांनी पांढऱ्या शुभ्र रंगाचा नवीन कुर्ता-पायजमा परिधान केला होता. कार्यक्रम सुरु झाला अजून २ लोकांची भाषणे झाली की, साहेबांचा नम्बर होता.

            आम्ही दोघेजण बसताना शेजारीच बसलो होतो. परंतु अचानक शेजारी बसलेले गोरे साहेब कुठे गायब झाले काही कळायला मार्ग नव्हता. सुरुवातीला वाटले खिशात लिहून आणलेला भाषणाचा कागद वाचत बाहेर उभे असतील, येतील थोड्या वेळात... पण बराच वेळ साहेब आलेच नाहीत . आता आयोजक सुद्धा साहेबांचं नाव पुकारू लागले पण तरीही साहेबांचा कुठून रिप्लाय येईना . नशीब , पुढील २-३ मिनिटात अचानक साहेब स्टेजवर आले आणि एकदाची त्यांचं फालतू व्याख्यान सुरु झालं. अचानक माझी नजर साहेबांच्या कपड्यांवर गेली , नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे हे माझ्या लक्षात आले . कारण अंगावर सकाळी परिधान केलेला पांढरा कुर्ता होता परंतु पायजमा नव्हता . अहो नव्हता म्हणजे सकाळवाला पांढऱ्या रंगाचा नव्हता, बदललेला पायजमा चक्क गुलाबी रंगांचा (स्पायडर मॅन च्या पॅन्ट ) सारखा दिसत होता. मला ह्यांच्या कपड्यांचा कलर चेंज कधी , कसा आणि कुठे झाला हे अजिबात समजलं नाही. शिवाय कपड्याच्या कलरचे कॉम्बिनेशन इतके गावंढळ दिसत होते की, खरंच त्यांच्याकडे पाहवत नव्हते. तो त्यांचा जोकर सारखा अवतार मुलांच्या लगेच लक्षात आला, एकतर ह्या कार्यक्रमाला हॉस्टेल ची पोर रेक्टर ची मर्जी राखण्यासाठी नाईलाजाने बसली होती. होस्टेलच्या पोरांचं वय मस्ती करण्याचं होत, पोर एखाद्या संधीची वाटच पाहत होती. त्यातून ही संधी समोरून चालून आली होती त्यामुळे त्या संधीचा बरोबर फायदा पोरांनी उचलण्यास सुरुवात केली ! पोरांमध्ये बरेच शीघ्र कवी बसले असावेत दोनच मिनिटात एक गाणे तयार करून पोर मोठमोठ्याने गाऊ लागले,
" पांढऱ्या रंगाचा बगळा, त्याचे गुलाबी रंगाचे पाय !
अहम भाग्य हे आपुले , वाजवा टाळ्या पाहताय काय !
बगळा देतोय, स्वछतेवर भाषण हाय-फाय , भाषण हाय-फाय !! ".

             साहेबांनी परिधान केलेला बगळा ड्रेस पाहून हॉस्टेल मधल्या पोरांना गोंधळ घालण्यासाठी एक फुकट विषय मिळाला आहे याची आयोजकांना कल्पना आली. कदाचित आत्तापर्यंत झालेली सर्व भाषणे रटाळ झाली होती आणि अचानक समोर जोकर आला. मग काय पोरांनी इतका दंगा केला की, आयोजकांना सुद्धा असे वाटू लागले की , कुठून दुर्बुद्धी सुचली आणि ह्या माणसाला आमंत्रण दिले. समोर बसलेली सर्व मुले आऊट ऑफ कंट्रोल झाली !... कुणी, "ये बगळ्या " म्हणून ओरडायचे तर मधूनच सर्वजण खूप टाळ्या वाजवायचे. परंतु कसल्याही आवाजा मध्ये आमच्या साहेबांच्या भाषण देण्याच्या प्रक्रियेला विचलित करण्याची ताकद नव्हती. स्वभावाप्रमाणे आपण देतोय ते भाषण, कुणाला आवडतंय का ह्याबद्द्ल काहीही देणे-घेणे नसलेले आमचे साहेब पोरांच्या टाळ्यांना उत्तम प्रतिसाद समजत होते. खरे तर, ह्या सर्व गोंधळात गोरे साहेबांचे भाषण त्यांच्या स्वतः व्यतिरिक्त कुणालाही ऐकू आले नव्हते. साहेबांचं व्याख्यान संपल्यावर बाकीच्या उरलेल्या वक्त्यांची भाषणे आयोजकांनी जास्त राडा नको म्हणून चक्क रद्द केली. साहेबांना औपचारिकता म्हणून पुष्पगुच्छ देऊन आभार काय व्यक्त केले, तर साहेबांचा नेहमीप्रमाणे गोड गैरसमज झाला. त्यांना नेहमीप्रमाणे हेच वाटले की, त्यांच्या अमूल्य अश्या भाषण शैली मुळे सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत. असो कसातरी तो कार्यक्रम पार पडला, आता, " साहेबांसमोर कुणी गीता वाचावी ?" म्हणून मी पण, "खूप सुंदर-अप्रतिम भाषण " या सारखे शब्द साहेबांच्या तोंडावर फेकून मारले एकदाची. सर्व आयोजकांना भेटून झाल्यावर साहेब आणि त्यांचा वाढलेला कॉन्फिडन्स सोबत घेऊन त्या विद्यापीठाच्या परिसरातून आम्ही बाहेर पडलो.
थोडे अंतर पार झाल्यावर मी साहेबांना विचारलं, सर तुमचे कपडे तुम्ही कधी आणि कुठे बदलून आलात?
ते म्हणाले , " अरे ह्या बदललेल्या वस्त्रांमुळेच मुलांना माझे भाषण आवडले. मला तर वाटते आजच्या यशाचे श्रेय ह्या गुलाबी रंगाच्या पायजमा ला द्यायला पाहिजे ".
मी उत्सुकतेपोटी विचारले यशाचे श्रेय पायजमा ला ? का बरे असे का ?
अरे , तो पायजमा परिधान करण्याआधी मी खूप अस्वस्थ होतो कारण आज " पहिल्या दिवशीचे भाषण कसे होणार ?" ह्याचे मला थोडे टेन्शन होते , परंतु ज्या क्षणी मी हा लकी पायजमा परिधान केला, तेंव्हापासून मी फुल्ल कॉन्फिडन्ट बनलो रे !.
सर जी, " तुम्ही काय बोलताय मला काही समजत नाहीये, खरे तर हा गुलाबी रंगाचा लकी पायजमा तुम्हाला भेटला कुठे ? जरा सविस्तर सांगाल का जरा ? ".
अरे तुला तर माहिती आहे, " मला माझ्या शुगर च्या प्रॉब्लेम मुळे सारखं एक नम्बर ला जावं लागत. आज माझे भाषण सुरु झाल्यावर ती वेळ येऊ नये म्हणून मी पाणी पिण्याचे आवर्जून टाळले होते. पण अचानक माझ्या भाषणाची वेळ जवळ आल्यावर मला अस्वस्थ वाटू लागले..... कारण माझी एक नम्बर ला जायची वेळ झाली होती . त्यामुळे मी वॉशरूम च्या शोधात हॉस्टेल मध्ये शिरलो ".
मला वाटलेच असेच काहीतरी असणार .... त्यामुळेच मला न सांगता तुम्ही बाहेर गेलात . पण ही पायजमा कुठून मिळाली ?
सांगतो ! मी त्या हॉस्टेल च्या वॉशरूम मध्ये गेलो, परंतु हे असले नाडी असणारे कपडे बापजन्मी वापरले नव्हते. त्यामुळे माझ्या पायजम्याची नाडी सुटण्याऐवजी घट्ट झाली. तिकडे भाषणाची वेळ जवळ आली होती आणि त्याच वेळी इकडे माझे " नाडीयुद्ध " सुरु झाले होते.
अरे देवा ...! सर मग पुढे काय केले तुम्ही ?
अरे काय करणार, " कुणी मदतीला भेटतंय का हे शोधले परंतु सर्व विदयार्थी कार्यक्रमाला गेले असल्यामुळे कुणीही सापडेना. शेवटी परमेश्वर कृपेने एकजण सापडला ".

           त्या होस्टेलच्या जिन्याखाली एक " भागवत खोबने " नावाचा पोरगा इस्त्री चे दुकान चालवितो, तो तिथेच गावठी दारू पिऊन झोपला होता . त्याला उठवून माझ्या प्रॉब्लेम बद्दल सांगितले, त्या बिचाऱ्याने थोडा प्रयत्न केला पण नाडीची गाठ काही सुटायचं नाव घेईना. शेवटी माझ्या नावाच्या Announcement ऐकू येऊ लागल्या.... तेंव्हा मात्र नाडी कापण्याव्यतिरिक्त आमच्याकडे एकही पर्याय उरला नव्हता. आता हे प्रकरण संपवून मला स्टेजवर जाणे गरजेचे होते ....म्हणून पायजम्याची नाडी भागवत नी कापून टाकली. आता नाडी परत एड्जस्ट करायला वेळ नव्हता ....त्यामुळे भागवत नी मला त्याच्या दुकानातील कस्टमर ची हाताला येईल ती पायजमा दिली.
बापरे ....! सर किती प्रकारची संकटे पार करत तुम्ही शेवटी भाषणाला हजेरी लावलीत ....म्हणजे खरंच त्या भागवत खोबण्यांनी दिलेला 'गुलाबी पायजमा ' तुमच्यासाठी लकी होता.
ते म्हणतात ना, "शो मस्ट गो ऑन ! ".
पण सर हा स्पायडर मॅन च्या पॅन्ट सारखा पायजमा तुम्हाला शोभत नाही, त्याला त्याचा पायजमा परत देऊन टाका .
आता भागवत ला पायजमा जागतिक " स्वछता वीक " पूर्ण झाल्याशिवाय परत द्यायचा नाही. तसेही त्या दारुड्या भागवत ला आपला पत्ता कुठे माहिती आहे ? आठ दिवसांनी देऊन टाकू त्याला त्याचा पायजमा परत.
आता साहेबांच्या ह्या घेतलेल्या पक्क्या निर्णयापुढे मी तर काय बोलणार ? मी आपला गप्प बसून नेहमीप्रमाणे तमाशा पाहत राहिलो.
पुढील ८ दिवस गोरे साहेब तो लकी " गुलाबी पायजमा " दररोज परिधान करत होते ....त्याचा वास सुटला तरी ह्या माणसाने तो पायजमा काढलाच नाही. शिवाय मला माझी अजिबात इच्छा नसताना देखील ह्या अस्वछ माणसाबरोबर " विद्यार्थी दशेत स्वच्छतेचे महत्व " ह्या विषयावरील व्याखान ऐकत फिरावं लागलं ! सॉरी..... जागतिक " स्वछता वीक " साजरा करावा लागला.
लेखन- अनिल पिसे.

No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]