Latest technology news and Review, Motivational Quotes, use of Online learning techniques to improve self-studies about Deep Learning and AI. Benefits of Sahajayoga meditation and experiences

Full width home advertisement

Technology

Entertainment

Post Page Advertisement [Top]

आपल्यापैकी बहुतेक सर्वजण नेहमी कोणत्या न कोणत्या तीर्थक्षेत्र अथवा आपल्या गावातील मंदिरात दर्शन घेण्यासाठी म्हणून जात असतो. परंतु नेहमी असा आपणाला अनुभव येत असतो कि, आपण खूप चांगल्या मूड मध्ये घरून निघालेलो असतो आणि त्याच चांगल्या मूड मध्ये आपण परमेश्वराच्या मंदिरात म्हणजे जिथे मूर्ती आहे त्या गाभाऱ्यात असणे अपेक्षित असते पण तसे सहसा होत नाही. आपण आपली मानसिक स्थिती सांभाळू शकत नाही त्याची अनेक कारणे आहेत. आपण स्टेप-बाय-स्टेप पाहू, आपण त्या मंदिराजवळ गेल्यानंतर पहिलं म्हणजे आपल्याकडे एखादे वाहन/गाडी असेल तर ते पार्क करण्याचं टेन्शन आपण फुकट घेतो. आपणाला माहिती असते की, इथे कधी-कधी जास्त वेळ जातो पण आपण नेहमी कसेतरी जुगाड करून गाडी पार्क करतोच तरीही मज्जा म्हणून का होईना आपण थोडस डिस्टर्ब होतोच . मंदिराजवळ पोह्चल्यानंतर आपल्या चपला ठेवल्यापासून सुरु झालेला आपला " देव-दर्शन " नावाचा प्रवास हळू-हळू आपल्यामध्ये एक प्रकारची चीड निर्माण करतो. जसे कि , चप्पल ठेवताना चपला सांभाळण्याच्या बदल्यात आपल्याला प्रसादाच्या नावावर काहीतरी विकत घ्या म्हणून मागे लागतो तो ' माणूस ' , पुढं कुणीतरी ' माळी ' , "ओ देवासाठी हार घ्या " आता त्याचे हार अजून पाहतोय तोपर्यंत , अचानक एखादा ' भिकारी ' समोर उभा होतो आणि तीथुन पुढे निघतो तो पर्यंत एखादा होमगार्ड (सुरक्षा रक्षक नावाचा कीड-मिडा माणूस ) आपल्याला एखाद्या अतिरेकयांसारखा चेक करून लाईन मध्ये उभा करतो. अजून आपण रांगेत स्थिर होतोय तोपर्यंत एखादा ' एजन्ट ' येऊन आपल्या कानात, "चला डायरेक्ट दर्शन " रांग सोडून लगेच दर्शन असे काहीतरी कुजबुजतो. कसेतरी आपण देवाच्या मूर्तीजवळ पोहचतो तर तिथे असणारा ' पुजारी ' "चला, चला पुढे चला " ,"चला. चला ओवाळणी करा, ओवाळणी करा " असे म्हणत एखाद्या देणेकऱ्याप्रमाणे आपल्याला अक्षरश: गाभाऱ्याबाहेर ढकलून देतो. आता ह्या सर्व प्रकरणात आपण आपले चित्त मंदिराच्या गाभाऱ्यात उभे असून सुद्धा परमेश्वराच्या मूर्तीपेक्षा आपल्यासोबत घडणाऱ्या घडामोडींकडे जास्त खर्च करतो. जर टक्केवारी काढली तर ९० % आपली ऊर्जा गाभाऱ्याजवळ पोहचण्याआधीच नष्ट झालेली असते. ह्या घटनाक्रमाचा विचार केला तर लक्षात येईल की, आपण मंदिरात " देव-दर्शन " घेण्यासाठी आलोय याचा आपल्याला विसर पडतो कारण चित्त नावाचे अश्व भलतीकडेच दौड करत असते . सुरुवातीपासून म्हणजे अगदी चप्पल सांभाळणारा, प्रसाद विकणारा, भिकारी , सुरक्षा रक्षक , डायरेक्ट दर्शन करविणारा एजन्ट , आणि शेवटी तो पुजारी ह्यांपैकी कुणालाही भेटण्यासाठी आपण तिथे गेलेलो नसतो . परंतु आपण त्यांच्याच सोबत आपले डोके लावून जड डोक्यानी घरी परत येतो. म्हणजे आपण ह्या "देव-दर्शन" नावाच्या प्रवासामध्ये मध्ये " दर्शन " सोडून बाकी सर्व काही करून येतो. खरे पाहिले तर ह्या सर्व प्रकारामध्ये आपला दोष नसतो परंतु आपल्या अंगवळणी पडलेले असते ते हेच कि , "आपण जर एखाद्या ठिकाणी गेलोय तर ते कुणासाठी आणि कशासाठी हे विसरून जे करायचे ते मनापासून न करता बाकीचे धंदे करून परतण्याची आपल्याला जणू सवय लागलेली असते ". आपण स्वतः पेक्षा आपल्या आजूबाजूच्या लोकांवर आणि घडणाऱ्या घटनांवर जास्त लक्ष देतो आणि काही मनाविरुद्ध होत असेल तर लगेच रिऍक्ट होतो, त्यामुळे आपण असंतुलित होतो त्याचे रूपांतर मग टेन्शन डिप्रेशन ह्यांमध्ये होते.
आता "देव -दर्शन" हे उदाहरण म्हणून घेऊ, त्यामध्ये आपण, " परमेश्वराचे दर्शन प्राप्त करणे " हे जर आपले टारगेट मानले तर ते टारगेट/ ध्येय प्राप्त करण्यासाठी कुणीही आपणाला रोखू शकत नाही. ह्यामध्ये टारगेट समोर असूनही प्राप्ती न होणे हे निश्चितच असते कारण त्या मंदिराजवळ असणारे बाकीचे लोक त्यांचं काम करत असतात पण आपण आपला असा समज करून घेतलेला असतो की , हे सर्व घटक आपल्याला टॉर्चर करत आहेत. खरे तर आजूबाजूच्या घटकांवर (माणूस अथवा घटना ) यांवर नेहमी आपण रिऍक्ट होऊन आपल्यालाच त्रास देत राहतो त्याचे रूपांतर स्ट्रेस मध्ये होते. आपल्या रोजच्या जीवनात असेच काही घडत असते आणि ते हाताळण्यास आपण कुठेतरी कमी पडतो त्यामुळे आपोआप टेन्शन किंवा डिप्रेशनच्या विळख्यात आपण सापडतो. समजा तुम्ही बारावी सायन्स चा विद्यार्धी आहात , बोर्डाचा गणिताचा पेपर सोडवत आहात त्यामध्ये जर एखादे गणित चुकले अथवा तुम्हाला जमत नसेल तर तिथं तुम्ही तुमची ऊर्जा टिकवून ठेवणे गरजेचे असते . त्यामुळे आपण ते गणित सोडविण्यासाठी थोडाफार प्रयत्न करतो अन नसेल जमत तर त्याचा नाद सोडून पुढचा पेपर सोडविण्यासाठी सरसावतो , तिथे त्या एका चुकलेल्या गणितामुळे संपूर्ण पेपर फाडून टाकत नाही. तसेच तुमच्याकडून जीवनामध्ये एखादी चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा अन नसेल जमत तर सोडून पुढचा जीवनरूपी पेपर सोडविण्यासाठी तुम्ही सरसावने गरजेचे असते. तिथे त्या एका झालेल्या चुकीमुळे संपूर्ण जीवनरूपी पेपर फाडून टाकण्याची दुसरी घोड-चूक करू नये. कारण आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं , याचा साधा अर्थ असा की, ध्येय प्राप्त करताना आलेले अपयश हे तात्पुरते असते. सहसा नॉर्मल मनुष्य जीवनरूपी पेपर फाडून टाकण्याची घोड-चूक करत नाही परंतु त्याच्या आजूबाजूचे घटक त्याला नेहमी त्याच्याकडून झालेल्या चुकीची आठवण करून देणे स्वतः चे परम कर्तव्य मानतात . खरे तर ह्या आजूबाजूच्या लोकांनी तुमच्याकडून झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी मदत करणे तुम्हाला अपेक्षित असते. परंतु नेहमी असे दिसून येते की , ते लोक तुम्हाला मदत करण्याऐवजी तुम्ही केलेली चूक कशी खुप मोठी चूक होती ह्यावर तासन-तास तुमच्यामागे गप्पा मारण्यात धन्यता मानतात. कारण त्यांना ती तुमच्याकडून झालेली चूक दुरुस्त करायचीच नसते ती फक्त चगळायची असते. म्हणूनच तर कुणाकडूनच कसलीही अपेक्षा न ठेवता आपण आपला जीवनरुपी प्रवास आपले टारगेट प्राप्त करण्यासाठी सुरु ठेवणे महत्वाचे ठरते , त्यासाठी तुमची सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणे गरजेचे असते. यशस्वी लोक काही गोष्टी मनापासून पाळतात त्यापैकी एक म्हणजे , नेहमी ते आपल्या आजूबाजूच्या लोकांना जे करायचे आहे ते करू देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःचे ध्येय प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतात. म्हणजे आपणाला यशस्वी होण्यासाठी आपल्या कामामध्ये सातत्य आणि दुसऱ्यांच्या दुर्गुणां कडे दुर्लक्ष ह्या दोन पायऱ्या उपयुक्त ठरतात. मागे कुठेतरी वाचनात आले होते की, " असं म्हटलं जातं, प्रत्येक जण आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात अडखळतो, पडतो, आपटतो, तो किती लवकर त्यातून सावरतो ते महत्त्वाचं असतं. अपयशाचा सामना करताना झाल्या गोष्टीतून शक्य तितक्या लवकर बाहेर पडणे आणि नव्याने सुरुवात करणे आवश्यक असते ". शिवाय आपणाला माहिती आहे की ,
रुकावटे सबूत हैं के आदमी ज़िन्दा हैं l
मरे हुये के लिये तो लोग वेसे ही रास्ता छोड़ देते हैं...ll
त्यामुळे कोणत्याही परिस्थिती मध्ये रिऍक्ट न होता आपण आपले जीवन सरळ मार्गी जगावे ....आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी आणि आजूबाजूच्या घटकांमुळे विनाकारण स्वतः ला त्रास करून घेऊ नये. आपणाला मिळालेल्या मानव जन्माचे सार्थक कसे करता येईल ह्यावर अत्यंत निष्ठेने विचार करणे आपणास जरुरी आहे. कुणीतरी खूप सुंदर सांगून गेलंय ,
जिंदगी मे खुद को कभी मुसिबतोंकी वजह से टूटणे मत दो ,
क़्युकि टूटे हुये घर कि इंटे तक लोग छोडते नही II
मुसिबतोंका का सामना इस तरह करो कि,
जितेंगे तो इतिहास बने और हारेंगे तो भी इतिहास बने II
आपल्या जीवनरूपी प्रवासात आजूबाजूच्या घटकांमुळे जमा केलेल्या नकारात्मक धाग्यांचा दोऱ्यांचा गुंता स्वतःच्या मेंदूमध्ये साठवून ठेवण्यापेक्षा, वेळ काढून डोक्यातून हे कुजके धागे-दोरे व्यवस्थित काढून त्याची गुंडाळी करून फेकून देण्यातच शहाणपण आहे. हे मेंदूमध्ये साचलेले जाळे जळमटे वेळेतच काढून डोके रिकामे करा नाहीतर विनाकारण आपली सकारात्मक ऊर्जा नष्ट होईल.

लेखन- अनिल पिसे.



No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]