Latest technology news and Review, Motivational Quotes, use of Online learning techniques to improve self-studies about Deep Learning and AI. Benefits of Sahajayoga meditation and experiences

Full width home advertisement

Technology

Entertainment

Post Page Advertisement [Top]

गोपालकाला :















खरे तर आमची गल्ली म्हणजे पंढरपुरातील हातावर पोट भरणाऱ्या लोकांचा समूह. लहान असल्यापासूनच म्हणजे आगदी चलन म्हणजे काय हे कळत नव्हते तेंव्हापासून आमच्या गल्लीतल्या पोरांना आई बापाला कामात मदत करायची आपोआप सवय लागते. आता गल्ली हि माळी लोकांची गल्ली असल्यामुळे कामात मदत करायची सुरुवात गजरे किंवा हार ओवून देण्यापासून होते. मग हळू हळू पैसे कळायला लागले कि आम्ही फुलांच्या लिलावातून एक-दोन ढीग कुंद किंवा मोगरा घेवून स्वतः ओवून दुपारी निघायचो चालत चालत गजरे विकायला. आमच्या पायाला जणू भिंगरी लावलेली असायची अक्खे पंढरपूर पालथे घालून सर्व गजरे विकून परत आपल्या गल्लीत यायचे.येताना पाव रगडा नाहीतर पाणीपुरी ऐटीत बसून खायची,खाताना दिसायचं कि आपल्या वयाची पोर आई बापासंग पाणीपुरी खात्यात पण मनात एक अहंकार वाढायचा तो हा कि स्वतः कमविलेल्या पैश्याची पाणीपुरी खातोय तुमच्यासारखी आई बापाच्या पैश्याची नाही.
लोकांना आम्ही एक गजरा आठ आणे ला सांगायचो तर काही मक्खी चुस ३ रुपयाला १० गजरे मागायचे. मग कुठे घासा-घीस करून ४ रुपयाला १० गजरे द्यायचो .कधी कधी मी हार आणि गजरे विकायला नदीला जायचो, नदीच्या पाण्यात लोक गाड्या धुण्यासाठी यायचे मग मस्त पैकी गाडीला हार आणि गजरे घेवून सजवायचे. मला आठ्वितय कि काही टेंपो चे driver लोक इतके हरामी असायचे कि ५ रुपयाचा हार ३ रुपयाला मागायचे, त्यांच्या पैसे कमी देण्याचा राग येत नसायचा मला .पण ते नालायक लोक टेम्पो वर चढून हार बांधायला लावायचे. खूपवेळा तो हार टेम्पो वर चढून बांधेपर्यंत माझे बाकीचे हार मोकाट जनावरे म्हणजे शेळ्या, बोकडे,गाई ओढून घेवून जायचे म्हणजे ह्याच्या ३ रुपयाचा हार बांधण्याच्या नादात २० रुपयाचे हार मोकाट जनावरे घेवून जायची.
पंढरपुरात वर्षातून २ मोठ्या वाऱ्या म्हणजे आषाढ अन कार्तिक आम्हा सर्वांसाठी खूप महत्वाच्या असायच्या. वारीत जे वारकरी दर्शनासाठी रांग लावतात त्याला बारी म्हणतात , त्या बारीत आम्ही रात्रंदिवस गळ्यात एक खोके बांधून लेमन गोळ्या आणि बिडी ,सिगरेट हे विकायचो. आजही तो विकतानाचा आवाज आठवितो. मी एका वेगळ्याच सुरात म्हणायचो "लेमन-लेमन-लेमन" ,"बिडी-काडी-सिगरेट".त्या वारीच्या सीझनमध्ये थकवा म्हणजे काय हे आपोआपच विसरून जायचो.
वारकर्यांसाठी वारीची सांगता म्हणजे गोपाल काला असायचा. त्या दिवशी गावात आलेल्या सर्व दिंड्या शिस्तबद्ध पद्धतीने गोपाळपूरला पहाटे जातात आणि तिथे प्रसाद म्हणून लाह्यांचा माण असायचा.मला तर फक्त इतकच माहिती होत कि गोपालकाला दिवशी लाह्या विकायच्या असतात. आमच्या गल्लीतील आम्ही ४-५ मित्र गोपाल काल्याला लाह्या विकायला जायचो. आमची गोपाल काल्याची तय्यारी म्हणजे ज्वारी आणायची आणि वालामावाशी च्या चीरमुरायाच्या भट्टी वर जावून त्या ज्वारीपासून लाह्या बनवून घ्यायच्या. अशीच त्या वारीला आम्ही संपूर्ण तय्यारी केली. आम्ही ५ जणांनी प्रत्येकी एक असे ५ लाह्याची पोती बनवून त्यावर स्वतः ची नावें शाईने लिहिली. मग काय आता उद्या सकाळी गोपाळकाला आहे , म्हणून आम्ही एकत्रितच झोपलो आणि पहाटे ४ वाजता उठून अंगोळ करून गोपाळपूरला जाण्यासाठी डोक्यावर लाह्याची पोती घेवून आमचा प्रवास सुरु केला. आमच्या ५ पैकी एका पोराच नाव होत गण्या सुरवसे त्याच्या पोत्यावर मीच त्याच नाव लिहील होत. आता लाह्या विकण्यासाठी आम्ही पंढरपूर पासून गोपाळपूर पर्यंत जिथे जागा रिकामी भेटेल तिथे उभे राहून दुकान मांडायचो. मला जागा मिळाली तिथे मी सुरु केल लाह्या विकायला. तसेच बाकीची पोर पण जिथे जागा मिळेल तिथे लाह्या विकू लागली.गण्याच नसीब फुटक बिचारा जागा शोधत-शोधत गोपाळपूर च्या जुण्या पुलापतूर गेला आणि नेमका पुलावर आपले लाह्याचे पोते ठेवून लाह्या विकू लागला. पहाटे ५-८ ह्या वेळेत माझ्या लाह्या जवळ-जवळ संपल्या.
अचानक कालवा उठला कि गोपाळपूर च्या पुलावर शेगावच्या गजानन बाबाच्या दिंडीतला हत्ती पिसाळला आणि चेंगराचेंगरी सुरु झाली.त्यात अनेक लोक पुलावरून खाली पडली काहीजण मेली.मला काही राहवेना मी आपला गण्या कुठाय हे पहायला तडक निघालो गोपाळपूरच्या दिशेने.खूप पोलिस आणि अफाट गर्दीआणि अश्यात गण्या काही दिसेना.मी पुलाच्या पल्याड पण जावून आलो आमच्याच गल्लीतील काहीजन तिथे लाह्या विकत होती.सर्वांना विचारल आर आपल्या गण्याला कुणी कुठ बघितल का ? सगळ्यांनी एकच उत्तर दिल कि गण्या त्या पुलावरच हुता लाह्या विकत. परत मी पुलाकडे निघालो. मला त्या "लाल चिकल " धड्यातील शेतकऱ्याने जसा टमाटयाचा चिकल केला हुता तसाच ह्या शेगावच्या बाबाच्या हत्तीने गण्याच्या लाह्यांचा पांढरा चिकल केलेला दिसला पण गण्या काय दिसला न्हाय. मी त्या पांढऱ्या चीकलाजवळ जावून घुम्या सारखा उभा राहिलो आणि त्या पोत्यावर मीच लिहिलेलं गण्या सुरवसे हे नाव वाचू लागलो. एका पोलिसांनी मला हटकल "ए बारक्या जा कि पुढ" , मी म्हणालो काका माझा एक दोस्त हित लाह्या विकायला आला हुता पण आता दिसत नाहीये. कदाचित त्या पोलीस काकाला माझी दया आली आणि त्यांनी मला ह्या चेंगराचेंगरी मध्ये मयत झालेल्या लोकांच्या जवळ नेवून. मयताची तोंड न दाखविता फक्त कपडे दाखविले आणि ३ नंबर ला आमचा गण्या सुरवसे निपचित पडला होता. गण्या पुलावरून खाली पडून डोक्याला मार लागल्यामुळे मयत झाला हुता.त्याचा आणि माझा तो गोपाळकाला हा शेवटचा ठरला त्या दिसापासन मी गोपाळकाला आणि लाह्या कायमच्या माझ्या जीवनातून पुसून टाकल्या.
‘गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला॥
'बाबाच्या हत्तीला झटका आला | गण्या मला सोडून गेला ||
‘गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला॥

लेखन -अनिल पिसे.

No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]